धाराशिव- ऐन सणासुदीच्या काळात धाराशिव शहरातील पथदिवे बंद असल्याने शहर काळोखात आहे. याकडे राज्य सरकारसह जिल्हा व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे मंगळवारी (दि.7) शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नपच्या खांबावर कंदील लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकार व प्रशासनाचा निषेध केला. पथदिवे सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर, आमदार कैलास (दादा) पाटील, मा.नगराध्यक्ष तथा सहसंपर्कप्रमुख मकरंद (नंदूभैय्या) राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून धाराशिव शहराच्या विविध भागांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्यस्थितीत शहरातील जवळपास 30 ते 40 टक्के पथदिवे (एलईडी) बंद अवस्थेत आहेत. गौरी गणपती, नवरात्र सणापूर्वी शहरातील पथदिवे सुरू करून नागरिकाची गैरसोय दूर करावी, याबाबत यापूर्वीही आम्ही नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी याना निवेदने सादर करून विनंती केली होती. परंतु जिल्हाधिकारी प्रशासन व नगर पालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आता दिवाळी सण तोडावर आलेला आहे. परंतु या सणातही नागरिकांना अंधारात चाचपडत जाण्याची वेळ असल्यासारखी परिस्थिती आहे. केवळ जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाच्या उदासिन वृत्तीमुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासन कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांनाही अनेकवेळा विनंती करूनही त्यांचेही कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात जवळपास 250 डीपी आहेत. या डिपीवरून पथदिव्यांना वीजपुरवठा केलेला आहे. शहरात जवळपास 10 हजार पथदिवे असून, त्यापैकी जवळपास 30 ते 40 टक्के पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. हे पथदिवे सुरू करण्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तर पालिकेचे कर्मचारी त्या पथदिव्याचे (एलईडी) फक्त कार्बन काढून तात्पुरती मलमपट्टी करीत आहेत. या कामासाठी पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ असून फक्त दोनच कर्मचारी आहेत. सध्या पालिकेकडे एकही एलईडी शिल्लक नाही. नवीन पथदिवे बसविण्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. पथदिव्यांचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीला पालिका तीन ते साडेतीन कोटी रुपये देणे असल्याचे सांगण्यात येते. शहराच्या काही भागात 24 तास पथदिवे सुरू असतात तर बहुतांश भागातील पथदिवे रात्रीही बंदच असतात. त्यामुळे पाराशिव शहरातील नागरिकांना अंधाराचा सामना करीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळी सणापूर्वी धाराशिव शहराच्या विविध भागांतील बंद असलेल्या ठिकाणी नवीन पथदिवे बसवून अंधाराचे साम्राज्य दूर करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, शहरप्रमुख तथा मा. गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, बंडू आदरकर, तुषार निंबाळकर, प्रवीण कोकाटे, सुरेश गवळी, नितीन शेरखाने, प्रदीप घोणे, दीपक जाधव, पांडू भोसले, संकेत सूर्यवंशी, अभिराज कदम, नवज्योत शिंगाडे, मुजीब काझी, अफरोज पीरजादे, राज निकम, निलेश साळुंके, बाळासाहेब वरुडकर, मनोज पडवळ, अमित जगधने, सुमित बागल, अभिजित देशमुख, दिनेश बंडगर, कलीम कुरेशी, रवि वडणे, अजिंक्य राजेनिंबाळकर, प्रवीण केसकर, शिवराज आचार्य, साबेर सय्यद, नितीन राठोड, महेश लिमये, शुभम कदम, सुधीर अलकुंटे, हणमंत देवकते, ओंकार बांगर, अमोल जाधव, अश्रूबा मुंडे, अरबाज शेख, शिवप्रताप कोळी, गणेश मुंगसे, वैभव वीर, प्रशांत जगताप, गफूर शेख, रुपेश शेटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
क्रेनच्या साह्याने खांबावर चढून लावला कंदील
शहर काळोखात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या खांबावर क्रेनच्या साह्याने कंदील लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.