धाराशिव: निवडणूक प्रक्रियेत पक्षातील निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातील किंवा आयात उमेदवारांना संधी दिल्याच्या विरोधात ‘धाराशिव लाइव्ह’ने आवाज उठवला होता. या धारदार बातम्यांचा मोठा परिणाम दिसून आला असून, धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या गटांमध्ये निष्ठावंतांना अखेर न्याय मिळाला आहे. ‘धाराशिव लाइव्ह’च्या वृत्ताची दखल घेत दोन बड्या नेत्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
पळसप गटात अजित लाकाळ यांचा मार्ग मोकळा
धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटात शिवसेनेची उमेदवारी मुळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, या ठिकाणी शिवसेनेने भाजपचे कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांना उमेदवारी दिली होती. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. ‘धाराशिव लाइव्ह’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर आज अखेर नेताजी पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक अजित लाकाळ यांना न्याय मिळाला आहे.
सिंदफळ गटातही निष्ठावंतांचा विजय
दुसरीकडे, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गटात भाजपने शीतल ढोले यांना डावलून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांना उमेदवारी दिली होती. अस्मिता कांबळे या ‘गेटकेन’ (आयात) उमेदवार असल्याची टीका होत होती आणि यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भातही ‘धाराशिव लाइव्ह’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीच्या दणक्यामुळे आज अस्मिता कांबळे यांनीही आपली माघार जाहीर केली आहे.
‘धाराशिव लाइव्ह’चे मानले आभार
पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय ‘धाराशिव लाइव्ह’ने चव्हाट्यावर आणला. या बातम्यांमुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन अखेर दोन्ही गटातील आयात उमेदवारांनी माघार घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.







