नवी दिल्ली/धाराशिव: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विळखा आता पूर्ण झाला असून, शिवसेना ठाकरे गटाला दिल्लीत सर्वात मोठा सुरुंग लागला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी करून नवी दिल्लीत बोलावलेली संसदीय दलाची तातडीची बैठक फुटीच्या अधिकृत शिक्कामोर्तबाने संपली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला ठाकरेंचे ६ खासदार अनुपस्थित राहिले असून, केवळ ३ खासदार बैठकीला हजर झाले आहेत.
या अनुपस्थित ६ खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असून, ते २० जूननंतर कधीही अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला यामुळे थेट बळ मिळाले आहे.
राणादादा, आता कुठे लपवणार ती ‘राज्यमंत्री’ दर्जाची हौस?
दिल्लीतील या घडामोडींमुळे दिल्ली हादरली असेल की नाही माहीत नाही, पण धाराशिवमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील ऊर्फ ‘राणादादां’चा बीपी नक्कीच हाय झाला असणार! ज्या ओमराजे निंबाळकरांना राणादादा कालपर्यंत “बाळ आहेस तू, ” असं भर जिल्हाधिकारी कार्यालयात हिणवत होते, तेच ओमराजे आता थेट महायुतीच्या गोटात (शिंदे सेनेत) दाखल होत आहेत.
ज्या ओमराजेंचा चेहरा पाहायची राणादादांना ॲलर्जी होती, तेच ओमराजे आता महायुतीत येणार असल्याने भाजपमधील राणादादा विरोधी ‘निष्ठावंत गटात’ कमालीची खुशी, तर खुद्द आमदार राणा पाटील यांच्या गोटात मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
🩸 चुलत भाऊ, खुनाचा खटला अन् २० जूनचा ‘क्लायमॅक्स’!
ओमराजे आणि राणाजगजितसिंह हे नात्याने चुलत भाऊ असले, तरी या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. यांच्यात आडवा विस्तवही जात नाही, हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप राणा पाटील यांचे वडील आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे.
या बहुचर्चित आणि संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल नेमका २० जून रोजी लागणार आहे. या निकालावरच आता आमदार राणा पाटील यांचे संपूर्ण राजकीय भविष्य अवलंबून आहे. निकाल तोंडावर आलेला असतानाच ओमराजेंनी दिल्लीच्या बैठकीला मारलेली दांडी राणादादांची झोप उडवणारी ठरली आहे. आता थेट सत्तेच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन, सरकारच्या पाठबळावर ओमराजे हे राणा पाटलांचा राजकीय काटा काढणार, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.
🌪️ सत्तेचा संघर्ष: आता ‘घरगुती वाद युतीच्या मंचावर येणार!
लोकसभा निवडणुकीत राणाजगजितसिंहनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवून ओमराजेंना ‘बोलबच्चन’ आणि ‘खोटारडे’ ठरवण्याचा जंग जंग पछाडला होता. पण धाराशिवच्या जनतेने ओमराजेंच्या बाजूने असा काही कौल दिला की राणाजगजितसिंहचे सगळे दावे थेट कोलमडले. नेहमी अत्यंत हाय-फाय स्टाईलमध्ये फिरणाऱ्या राणादादांना ओमराजेंची ती साधी, रांगडी आणि लोकांमध्ये मिसळण्याची स्टाईल कधी पचलीच नाही.
जिल्हा परिषदेतील ठाकरे सेनेच्या ७ पैकी ४ सदस्यांचा आणि नगर परिषदेतील ७ पैकी ५ सदस्यांचा पाठिंबा घेऊन ओमराजे जेव्हा शिंदे गटात जातील, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा सारीपाटही बदलेल. दुसरीकडे, आमदार कैलास पाटील आणि आ. प्रवीण स्वामी ठाकरेंसोबतच राहणार असल्याने जिल्ह्यात ‘आमदार विरुद्ध खासदार’ सामना रंगात येईल.




