धाराशिव – 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी केला होता.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे महायुती तथा राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी सकाळी प्रचार फेरी काढून जाहीर सभा घेतली होती. त्यात हा गौप्यस्फोट केला होता.
आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण असल्याचे सांगून 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, अजित काकांनी आम्हाला पुढे पाठवले आणि नंतर ते मागून महायुतीत आले, हे मी जबाबदारीने बोलतो, असेही मल्हार पाटील म्हणाले.
या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ मल्हार पाटील यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता. मल्हार पाटील यांच्या या वक्तव्याची दाखल अनेक वृत्तवाहिन्यांनी घेऊन बातम्या प्रसारित केल्या. त्यानंतर अजित पवार यांच्या सांगण्यावरून पाटलांनी तो व्हिडीओ फेसबुक पेजवरून डिलीट केला.