धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचा तब्बल ३ लाख २९ हजार मतांनी पराभव करून महायुतीला सणसणीत चपराक दिली आहे. एकीकडे विधानसभेचे पाच आणि विधान परिषदेचे दोन असे सात आमदार, त्यात काँग्रेसमधून आयात केलेले बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण यांची फळी असताना, ओमराजे निंबाळकर यांची ‘वन मॅन आर्मी’ मोदीच्या त्सुनामी लाटेवर भारी पडली.
लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील – मुरूमकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत बसवराज पाटील यांच्या मुरूम गावात ओमराजेंना ८५५ मताची आघाडी मिळाली. ओमराजे यांना एकूण ४१३९ ते अर्चना पाटील यांना ३२८४ मते पडली.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना पाठींबा दिला होता. मात्र सुनील चव्हाण यांच्या अणदूर गावात ओमराजेंना ४२० मताची आघाडी मिळाली. ओमराजे यांना एकूण २६६३ तर अर्चना पाटील यांना २२४३ मते मिळाली. यावरून भाजपमध्ये आयात केलेले बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण लोकसभा निवडणुकीत फेल झाल्याचे स्पष्ट होते.
दाजी आणि काकाही फेल
धाराशिवमध्ये दाजी अर्थात सुरेश बिराजदार व काका म्हणजे राष्ट्रवादीचे (अजित) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या पक्षाला उमेदवारी मिळाली होती. त्यांना या संधीचे सोने करण्याची संधी होती. मात्र, दोघांच्याही गावातून ओमराजेच आघाडीवर आहेत. बिराजदारांच्या बलसूरमध्ये (ता. उमरगा) ओमराजेंना ८६४ तर धुरगुडेंच्या मंगरूळमध्ये (ता. तुळजापूर) ओमराजेंना ९८२ मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रवीण यादव यांच्या हासेगावात अर्चना पाटील यांना १०२ मतांची आघाडी आहे.
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे आमदार राहुल मोटे यांचे मामा आहेत. मोटे यांनी आमदारकीची हॅट््ट्रिक केली होती. यामध्ये डॉ. पाटलांचा मोठा वाटा होता. परंतु, मामाच्या सुनेला मोटे यांच्या गिरवलीत केवळ ८९ मते मिळाली. मोटे यांनी महाविकास आघाडी म्हणून अर्चना पाटलांच्या विरोधात जोर लावला होता. तेथे ओमराजेंना ८९९ मतांची आघाडी मिळाली आहे. आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा गावातही ओमराजेंना २०९ मतांची आघाडी आहे.