धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अद्याप एमआरआय स्कॅन सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. ही सुविधा मंजूर होऊनही जागेअभावी मशीन कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे हलवण्यात आले आहे तसेच, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या सिटी स्कॅन मशीनलाही जागा नसल्याचे कारण देत लोणावळा येथे हलवण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्याचे मुख्यालय असूनही येथील शासकीय रुग्णालयात एम.आर.आय. आणि सिटी स्कॅनसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांची सोय उपलब्ध नाही. जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भाड्याने देण्यात आले आहे.
एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीनसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा जिल्ह्यात उपलब्ध होण्याची गरज आहे. मात्र, मंजूर झालेल्या सुविधा कार्यान्वित होण्याऐवजी इतरत्र हलवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. धाराशिव आणि तुळजापूरमधील रुग्णांना मोठ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी लातूर, सोलापूर किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैशांची मोठी अडचण निर्माण होते.
या निर्णयामुळे संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशासनावर टीका करत आहेत. जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत वैद्यकीय सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एमआरआय आणि सिटी स्कॅन सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आ. राणा जगजितिसंह पाटील यांना फोन केला असता, त्यांचा पीए सचिन याने फोन उचलला, त्यांना सांगितले असता आपण धाराशिवला आल्यानंतर यावर चर्चा करू, असे उत्तर दिले.
हेही वाचा