धाराशिव: सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारी असलेली मुदत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात ४ लाख ६२ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात २१ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
परंतु, सुरुवातीला हवामानातील बदलांमुळे अपेक्षित आद्रता नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन नेता आले नाही. त्यातच अनेक केंद्रांवर बारदाण्याची कमतरता असल्याने खरेदी प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे, ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ २१ टक्क्यांहून कमी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले होते.
यामुळे, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. म्हणून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळवून दिली आहे. यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.