तुळजापूर: तुळजापूर पोलीस स्टेशनच्या बाजूला जुन्या हैदराबाद बँकेच्या शेजारी एका अंडे विक्रत्याच्या घरी गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एकूण सहा स्फोट झाले आहेत, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्फोटाच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्फोटाची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे, ज्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तुळजापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, येथे आई तुळजाभवानीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. अशातच या स्फोटाच्या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्शनसाठी मंडप मारण्यात आला होता, ॲडिशनल एस पी (अतिरिक्त पोलीस अधीक्षक) देखील आले होते. मात्र, त्याचवेळी अंडे विक्रत्याच्या घरी झालेल्या स्फोटामुळे एकच गोंधळ उडाला.
सलग ६ सिलेंडरच्या स्फोटांनी तुळजापूर हादरले!
तुळजापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी पोलीस स्टेशनच्या बाजूला जुन्या हैदराबाद बँकेच्या शेजारी एका वस्तीत एका पाठोपाठ सहा सिलेंडरचे स्फोट झाले. या स्फोटाने तुळजापूर शहर हादरले आहे.
या वस्तीत अंडे विक्रेते, मोलमजुरी करणारे नागरिक राहत होते. त्यांची घरे विटांची असून वरती पत्रे टाकलेली होती. सुदैवाने, या वस्तीतील अनेकजण अपसिंगा रोडवरील एका पाहुण्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा, जीवितहानी झाली असती. स्फोटानंतर त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवले.
Video