धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे आणि लेखापाल सुरज बोर्डे हे जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत तर लेखापरिक्षक प्रशांत विक्रम पवार हे तीन महिन्यापासून फरार आहेत. पोलीस त्यांना शोधून काढण्यात अपयशी ठरले आहेत.
आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे २७ कोटीच्या गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी तीन महिने झाले तरी लेखापाल सुरज बोर्डे यांना अटक न झाल्याने या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यांनी अवघ्या काही दिवसात बोर्डे यांच्या मुसक्या आवळल्या. बांगर यांचे हात ओले झाल्याने बोर्डे मोकाट होते, पण राठोड यांनी बोर्डेला गजाआड करून तपास सुरु ठेवला आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी तांत्रिक आणि लेखा विषयक बाबी तपासण्यासाठी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र देऊन तज्ञ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची विनंती केली असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पोलिसाना मदत करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अकेले , शाखा अभियंता अमर भोजने, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी चंद्रशेखर काजळे यांचा समावेश आहे.
एसआयटी स्थापन होणार
धाराशिव नगर पालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. धाराशिवचे माजी जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करण्यात यावी, अशी आ. सुरेश धस यांची मागणी आहे.
ही प्रमाणके आली कुठून ?
धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी 514 प्रमाणके गायब होती. लेखापाल सूरज बोर्डे यांना पोलिसांनी अटक करून, पोलीस कस्टडी घेतली असता त्यांनी २४२ प्रमाणके पोलिसांच्या हवाली केली. चौकशी समितीने आठ स्मरणपत्र देऊनही त्यांना ही प्रमाणके का दाखवण्यात आली नाहीत ? नंतर आणून ठेवली असल्यास त्याची कस्टडी कुणाकडे होती, असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
गैरव्यवहार अंगलट आल्यानंतर नवीन प्रमाणके तयार करण्यात आली आहेत तसेच त्यावर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या सह्या नाहीत, अशी माहिती आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.