धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष, हातात पोस्टर, झेंडे घेतलेला प्रचंड मोठा जनसमुदाय आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकार्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला होता. महायुतीच्या एकोप्याची वज्रमूठ प्रचंड शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून धाराशिवकरांनी अनुभवली.
लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत, राज्यमंत्री संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू आमदार राजाभाऊ राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर रिपाइंचे अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ उपस्थित होते.
दरम्यान शहरातील जिजाऊ चौक येथून महायुतीतील राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आठवले गट, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उमेदवार अर्चना पाटील या ग्रामदैवत हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गाह, धारासूर मर्दिनी मंदिर व त्यानंतर काळा मारूती मंदिरात दर्शन घेवून रॅलीत सहभागी झाल्या. ही रॅली आर्य समाज चौक, संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर उमेदवार अर्चना पाटील यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष संपत डोके, बिभीषण काळे यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तर अमित शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सतीश चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भाषणे झाली.
नरेंद्र मोदींमुळेच जगात देशाला मानाचे स्थान – उपमुख्यमंत्री पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षांत केलेल्या गतीमान विकासकामांमुळे जगात देशाला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यामुळे मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ‘अबकी बार 400 पार’मध्ये चारशेवी जागा आपल्याला निवडून द्यावयाची आहे. राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजपा ही एकच असताना कार्यकर्त्यांना कसलाही दुजाभाव मनात न ठेवता महायुतीच्या अर्चना पाटील यांच्या विजयासाठी कामाला लागावे, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांची शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सतीश चव्हाण, पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार,आ.पाशा पटेल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे,अनिल खोचरे रिपाइंचे राजाभाऊ ओव्हाळ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड. अनिल काळे, दत्ता कुलकर्णी,सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील,नितीन बागल आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील महायुतीचे सरकार हे जनतेचे सरकार आहे. देशातील 30 कोटी गरिबांना हक्काची घरे देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या मदतीने गरीबांच्या कल्याणाच्या विविध योजना राबवित आहे. आगामी काळात 8.50 लाख सोलार पंप राज्य सरकार शेतकर्यांना देणार आहे. एक रूपयात पीकविम्यामुळे शेतकर्यांना मोठी मदत झाली आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून आर्थिक तरतूद केली आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील एक लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर जपानी कंपन्यांचे प्रकल्प, शाश्वत पाणी आणि उद्योग उभारून बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करणार्या मोंदीना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार अभिमन्यू पवार, पाशा पटेल, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा-लोहारा व औसा विधानसभा मतदारसंघातून, तसेच बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, खासदाराचे काम केंद्रातून मोठा निधी आणणे, केंद्रातील योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आहे. परंतु विद्यमान खासदाराने हे काम केले का, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करून नरेंद्र्र मोदींचे विकासाचे पर्व यापुढेही चालू राहील. मतदारसंघात शाश्वत पाणी, उद्योग आणि पर्यटनाला चालना देवून सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे सांगितले.
शिवसैनिकांनी राष्ट्रवादीपेक्षा जोमाने काम करावे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत महायुतीचा उमेदवार म्हणून धनंजय सावंत यांचा जानेवारी महिन्यापासूनच प्रचार सुरू होता. आजवर लोकसभेसाठी शिवसेनेने निवडणूक लढवली आहे. परंतु महायुतीत झालेल्या चर्चेअंती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. मात्र समोरच्या उमेदवाराचा या निवडणुकीत फडशा पाडायचा आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, यासाठी दुःख विसरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त जोमाने शिवसैनिकांनी उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
बार्शी व औसा मतदारसंघात लीड देण्यावरून स्पर्धा – आ.अभिमन्यू पवार
माझी आणि राजाभाऊ राऊत यांची अर्चना ताईंना मताधिक्य देण्याची स्पर्धा असून आमचे सर्व नेते व कार्यकर्ते यासाठी रात्रंदिवस काम करत आहोत.आजची गर्दी पाहून आपला विजय आजच निश्चित झाला आहे असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले.