धाराशिव: धाराशिव शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. रामजाने उर्फ राम लक्ष्मण क्षिरसागर (वय ३१, रा. वाघोली, ता. कळंब) आणि धनंजय उर्फ डीके हरिष काळे (वय २०, रा. कासारवाडी, पिंप्री चिंचवड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ३ ते ६ वाजण्याच्या दरम्यान शहरातील पोलीस ठाणे शहर आणि आनंदनगर हद्दीतील दोन घरांची कडी तोडून चोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे शहर आणि आनंदनगर येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला.
२ जानेवारी २०२५ रोजी पथकाला गुप्त बातमी मिळाली की, संशयित आरोपी रामजाने क्षिरसागर हा त्याच्या साथीदाराबरोबर कळंब येथील शिवाजी चौकात आहे. पथकाने तात्काळ तेथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले.
चोरीचे दागिने रामजाने याने आपल्या नातेवाईकाकडे दिले असल्याची कबुली आरोपींनी दिली. पथकाने दोघांकडून ५९.६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण ३,१८,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींनी धाराशिव जिल्ह्यात ९ तर लातूर जिल्ह्यात १ अशा एकूण १० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकण परिसरातही त्यांनी अनेक घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशानुसार सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली आहे.