धाराशिव – शहरातील किराणा दुकान, हॉटेल तसेच पान टपऱ्यावर गुटख्याची राजरोस विक्री सुरु आहे. गुटखा विक्रेत्यांचा शहर , आनंदनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दरमहा हप्ता असल्याने ठोस कारवाई होत नाही. याबाबत जास्तच बोंबाबोंब झाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील दोन पान टपऱ्यावर जुजबी कारवाई करण्यात आली आहे.
शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोस्ट ऑफीस शेजारील तुळजाई पान शॉप व हतलाई पान शॉप नावाचे दोन शॉपमध्ये दोन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध विक्री करत आहे, अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव असे सांगितले
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने सदर पान शॉपची पाहणी केली.त्यामध्ये पान मसाला, सुगंधित तंबाखू, बादशाहा, गोवा गुटखा पान बहार विमल पान मसाला चे पाउच असा एकुण 5,472 ₹ किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पान शॉपमध्ये ठेवलेला मिळून आल्याने त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन पान शॉप गुटखा विक्री करणारे 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांचेविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2003 कलम 26(2)(1), 26 (2)(4), 27(3)(ई), 30(2), 59 अन्वये गुरंन 437/2023 असा गुन्हा धाराशिव शहर पो.ठाणे. येथे 22.11.2023 रोजी नोंदवला आहे.
धाराशिव शहरात गुटख्याचे तीन मुख्य डीलर असून, वैराग रोड तसेच खाजा नगर भागात एका गोडाऊनमध्ये हा गुटखा साठवला जातो. तेथून दुचाकी वाहनावरून हा गुटखा हॉटेल्स आणि पान टपरीवर पोहच केला जातो, याची माहिती शहर पोलीस स्टेशन, आनंदनगर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस यांना असतानाही त्यावर छापा मारला जात नाही. सहा महिन्यातून एकदा केवळ नावापुरती किरकोळ विक्रत्यावर कारवाई केली जाते. मोठे मासे मात्र नामानिराळे आहेत.