धाराशिव: धाराशिव येथील सुलतान अझहर पटेल या तरुणाची ऑनलाईन फसवणूक करून त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ₹4.49 लाख लंपास करण्यात आले होते. मात्र धाराशिव सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही रक्कम परत मिळवून दिली आहे.
दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी पटेल यांना एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने स्वतःला ICICI बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत पटेल यांचे क्रेडीट कार्ड ॲक्टीव्हेट करण्यासाठी ओटीपीची मागणी केली. पटेल यांनी तीन वेळा ओटीपी दिला असता त्यांच्या खात्यावरून अनुक्रमे ₹96,092, ₹88,290 आणि ₹2,64,870 असे तीन व्यवहार झाले.
पटेल यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता ही रक्कम ॲमेझॉनवरून खरेदीसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ॲमेझॉनशी संपर्क साधून खरेदीचा ऑर्डर रद्द करून पटेल यांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी देऊ नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास तातडीने हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.