धाराशिव- तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालवाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. आगामी रब्बी हंगामात पिकांसाठी या कालव्याद्वारे पाण्याची आवर्तने मिळावीत, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तेरणा कालव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून 3.41 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची पाहणी करून त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठाकरे सरकारच्या काळात अनेकदा मागणी करूनही या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
तेरणा प्रकल्पावरील डाव्या व उजव्या कालव्याची एकूण लांबी ३२ किलोमीटर आहे. याद्वारे तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी व भंडारवाडी या गावांतील १६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर कामे वेळेत व दर्जेदार करून आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी तेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमंत फंड, . नवनाथ नाईकवाडी, . विठ्ठल लामतुरे, पद्माकर फंड, प्रतीक नाईकवाडी, रामा कोळी, नवनाथ पसारे, अनिल टेळे, किशोर काळे, मंगेश फंड, अर्शाद मुलानी,. संजय लोमटे यांच्यासह धाराशिव पाटबंधारे विभाग क्र १ चे कार्यकारी अभियंता ए. एम. मदने, उपविभागीय अभियंता डी. एम. नाईकनवरे, शाखा अभियंता डी. सी. वरपे आदींची उपस्थिती होती.
या रब्बी हंगामात कालवा दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणारच आहे, तसेच पाइपलाइनद्वारे सिंचनाच्या पथदर्शी प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.