धाराशिव – लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. ७ मे २०२४ रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७,४८,७५२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार सौ. अर्चना पाटील यांना ४,१८,९०६ मते मिळाली. ओमराजे निंबाळकर हे ३,२९,८४६ मताधिक्याने विजयी झाले.
मात्र, पराभूत उमेदवार सौ. अर्चना पाटील यांनी या निवडणुकीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले आहे. निवडणुकीत एकूण ३१ उमेदवार रिंगणात उतरले होते, आणि सौ. अर्चना पाटील यांनी सर्व उमेदवारांना प्रतिवादी केले आहे. त्यांच्या मते निवडणुकीत काही गैरप्रकार घडले असून निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नाही. या पिटिशनमध्ये त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदान यंत्रणांमध्ये झालेल्या तांत्रिक समस्या आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन यांसारख्या विविध मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
सौ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केल्याचे मान्य केले. यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात या आव्हानामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला असला तरी, या कायदेशीर लढ्यामुळे आता पुढील काळात या मतदारसंघात राजकीय वातावरण कसे राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.