धाराशिव: धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे आणि तहसीलदार मृणाल जाधव यांच्यात वाद पेटल्याने वातावरण तापले आहे. एन.ए. ले-आउट आणि गौण खनिज उत्खननातील कथित अनियमिततांवरून हा वाद सुरू झाला असून, तहसीलदारांनी डव्हळे यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. यामुळे तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
तक्रारदार अमोल जाधव यांनी धाराशिव व तुळजापूर तहसील कार्यालयात एन.ए. ले-आउट व गौण खनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा आरोप करत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकारी डव्हळे यांनी सुरू केली असता, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी फाईल्स दडवून ठेवल्याचा आरोप आहे.
दुसरीकडे, डव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप तहसीलदार जाधव यांनी केला आहे. हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विशाखा समितीकडे चौकशीसाठी पाठवले असून, समिती येत्या ३-४ दिवसांत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून अहवाल सादर करेल.
डव्हळे यांनी महिला अधिकारी यांचा जाणीवपूर्वक अपमान व मानसिक त्रास दिल्याचा आरोप तहसीलदार जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. या अनुषंगाने चौकशी होणार असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी सांगितले.
तहसीलदार जाधव यांनी आपल्याला कोणत्याही व्यक्तीला नव्हे तर प्रवृत्तीला विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नसून जिल्हाधिकारी यांनी इतर अधिकारी मार्फत शहानिशा करावी, अशी मागणी केली आहे.
डव्हळे यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी केली असून, त्यात कोणताही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती जी असेल तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल आणि ज्यांनी चुकीचे केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.