धाराशिव: धाराशिव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) गेल्या चार दिवसांपासून ‘अधिकाऱ्याविना’ सुरू आहे. कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनांची नोंदणी, परवाना नूतनीकरण, कर भरणे अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याप्रकरणी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व अधिकार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, सहाय्यक अधिकारी कार्यालयात नसतानाही त्यांच्या नावाने कामकाज सुरू कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
कार्यालयात मनमानी, कर्मचाऱ्यांचे अजब ‘राज्य’
सहाय्यक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयातील कर्मचारीही नियंत्रणमुक्त झाले आहेत. कामाचे तास पाळणे, नागरिकांशी योग्य प्रकारे वागणे अशा कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. काही कर्मचारी तर वेळेवर कार्यालयात येत नसल्याच्या तक्रारीही आहेत. यामुळे, आरटीओ कार्यालयात अराजकता पसरली असून, नागरिकांना त्यांची कामे उरकण्यासाठी ताटकळत पडावे लागत आहे.
प्रशासनाकडून कारवाईची मागणी
आरटीओ कार्यालयातील या गोंधळामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सहाय्यक अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणणे आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत करणे यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.