तुळजापूर : आठवडी बाजारातून ७० हजारांचा मोबाईल चोरीला
चिंचोली येथील अमित बाबासाहेब पाटील (वय २५) यांचा ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तुळजापूर येथील आठवडी बाजारातून चोरीला गेला. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
परंडा : शेतातून सव्वाचार लाखांचा ट्रॅक्टर लंपास
परंडा येथील माळी गल्लीतील राजकुमार बाळू गायकवाड (वय २७) यांचा महिंद्रा ६०५ अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच २५ बीएफ ७६६९) चोरीला गेला.
३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान भोत्रा येथील शेत गट क्रमांक ३६ मधून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव : २२० केव्ही उपकेंद्रातील तांब्याचे रॉड चोरीला
सांजा रोडवरील २२० केव्ही महापारेषण उपकेंद्रातील परंडा फिडरचे तीन कॉपर रॉड (४५ किलो) आणि मुरुड फिडरचे तीन अर्थ ब्लेड कॉपर (१५ किलो) असे एकूण ३६ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
२ नोव्हेंबरच्या रात्री १० ते ४ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपकार्यकारी अभियंता विशाल महारुद्र राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोरी शिवार : कारची काच फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास
बोरी शिवारात शेताच्या बांधाजवळ उभ्या असलेल्या होंडा कारची ड्रायव्हर बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
फिर्यादी सचिन हरिदास पवार (वय ४०, रा. कावलदरा, सध्या लातूर) यांच्या कारमधील ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ९ हजार ५०० रुपये रोख असा एकूण २ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४.२० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूम : शेतातून ५४ स्प्रिंकलर नोजल चोरीला
भूम तालुक्यातील चुंबळी शिवारातील शेत गट क्रमांक १८५ मधून शहाजी तुकाराम शिंदे (वय ३९, रा. लक्ष्मी नगर, भूम) यांच्या तसेच शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील फिनोलेक्स कंपनीचे एकूण ५४ स्प्रिंकलर नोजल चोरीला गेले.
२ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली असून, चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत २० हजार रुपये आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ढोकी : घरासमोरून १५ हजारांची दुचाकी लंपास
कोंड येथील महालिंग हरिश्चंद्र आरळकर (वय ५५) यांची बजाज प्लॅटिना मोटरसायकल (क्र. एमएच १३ डीएन ३८४२) घरासमोरून चोरीला गेली.
३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव : विद्युतवाहक तारही चोरट्यांनी पळवली
धाराशिव शहरातील एमएसईबी विश्रामगृहासमोरील स्टोअर यार्डमधून ॲल्युमिनियमची विद्युतवाहक तार अर्थात माउस कंडक्टर चोरीला गेला. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अनिल मधुकर तीर्थकर (वय ४२, रा. रुईभर, सध्या प्रेरणा नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ हजार ५०० रुपये किमतीच्या साहित्याच्या चोरीप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकाच वेळी विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.



