धाराशिव: ५ सप्टेंबर म्हणजे ‘शिक्षक दिन’. एरवी या दिवशी शिक्षकांचा सन्मान आणि सत्कार करण्याची आपली संस्कृती आहे. पण, ‘आपला जीव धाराशिव’ आणि ‘व्हिजन २०३०’ ची गोड गोड स्वप्ने विकणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेने इथल्या शिक्षण व्यवस्थेची इतकी वाट लावली आहे की, यंदाच्या शिक्षक दिनी इथल्या गुरुजींवर काळ्या फिती लावून काम करण्याची वेळ आली आहे! प्रशासनाच्या फसवणुकीला कंटाळून जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी आता थेट ‘आरपार’च्या लढाईची घोषणा केली आहे.
आश्वासनांची खैरात आणि प्रशासनाचा फसवेपणा
गेल्या १० ऑगस्ट रोजी ११ शिक्षक संघटनांनी रस्त्यावर उतरून शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले होते. ३ जुलै रोजी ५ ते ७ लाखांच्या ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून जे ‘शिक्षण विस्तार अधिकारी’ प्रमोशन वाटले गेले, त्याविरोधात हा संताप होता. त्यावेळी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षा ‘माऊली’ आणि प्रशासनाने फक्त वेळकाढूपणा करत “प्रक्रियेला स्थगिती देऊ आणि शासनाकडे मार्गदर्शन मागू” असे थातूरमातूर आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात, एवढे दिवस उलटूनही ती वादग्रस्त पदोन्नती प्रक्रिया अद्याप रद्द केलेली नाही!
शाळा एकत्रीकरण: प्रशासनाने चालवलेत स्वतःचेच ‘घोडे’
प्रमोशन घोटाळ्यासोबतच दुसरा मोठा मुद्दा आहे तो शाळा एकत्रीकरणाचा. ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाचा (GR) चुकीचा अर्थ काढून प्रशासन बळजबरीने शाळांचे एकत्रीकरण करत आहे. यात असंख्य त्रुटी आहेत, मुलांचे नुकसान होणार आहे हे वारंवार सांगूनही, झेडपी प्रशासन हुकूमशहासारखे ‘आपलेच घोडे दामटत’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
५ सप्टेंबरचा ‘काळ्या फितींचा’ तुटवडा!
या मनमानीला चाप लावण्यासाठी ‘धाराशिव जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती’ने ५ सप्टेंबरपासून बेमुदत साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ५ तारखेला जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक शाळेत दंडावर ‘काळी फीत’ लावून प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहे.
-
विशेष म्हणजे, संघटनांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले आहे की, “५ तारखेला खेड्यापाड्यात काळ्या फिती मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आजच फिती खरेदी करून ठेवा!” झेडपीच्या या कारभारामुळे आता जिल्ह्यात स्टेशनरीच्या दुकानातही काळ्या फितींचा तुटवडा निर्माण झाला, तर नवल वाटायला नको!
असे राहील साखळी उपोषणाचे ‘हायव्होल्टेज’ वेळापत्रक:
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज एका तालुक्याचे १०० शिक्षक साखळी उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना शक्य आहे, ते शिक्षक स्वतःहून ‘अर्जित रजा’ टाकून या संग्रामात उतरणार आहेत.
-
पहिला दिवस (५ सप्टेंबर): धाराशिव तालुका
-
दुसरा दिवस: तुळजापूर
-
तिसरा दिवस: कळंब
-
चौथा दिवस: लोहारा
-
पाचवा दिवस: वाशी
-
सहावा दिवस: भूम
-
सातवा दिवस: परांडा
-
आठवा दिवस: उमरगा
स्वतःच्या दिमतीला दीड-दोन कोटींच्या नव्या/भाड्याच्या गाड्या घेणाऱ्या, मोक्याच्या जागांवर बीओटीचे (BOT) इमले बांधणाऱ्या आणि रोज नव्या घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता गुरुजींचा हा एल्गार झेपणार का? शिक्षक दिनी काळ्या फिती बांधलेले गुरुजी पाहिल्यावर तरी ‘माऊलीं’ना आणि झेडपी प्रशासनाला शहाणपण सुचणार की ते अजूनही डोळ्यांवर पट्टी बांधूनच बसणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे!




