नळदुर्ग : निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या माजी कर्मचारी तथा राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पोळ (३०) यांनी गुरुवारी दुपारी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून सुमारे 100 फूट खाली उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेत अश्विनी पोळ -मोहिते ( (रा. व्हंताळ, ता. उमरगा; सासर अंबुलगा, ता. निलंगा) आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अभिजित यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा आणि क्रांती या गंभीर जखमी झाल्या होत्या. दोन्ही मुलींना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान क्रांती हिचाही मृत्यू झाला. सध्या वीरा ही गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अश्विनी पोळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या. त्यांच्या कुटुंबातील वडील, भाऊ, आई आणि बहीण हे देखील कुस्तीपटू असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या कुस्तीतील कामगिरीमुळे अश्विनी यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते.

दरम्यान, अश्विनी यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेमुळे व्हंताळ, अंबुलगा तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका राष्ट्रीय कुस्तीपटू महिलेचा आणि तिच्या तीन लहान मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.





