महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची पुजनीय मूर्ती तुळजापूर येथे स्थापित आहे. देवीच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणा येथून हजारो भाविक तुळजापूर येथे येतात. परंतु, या तीर्थक्षेत्रात जाण्यासाठी भाविकांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध नाही. सोलापूर किंवा धाराशिव पर्यंत रेल्वेने पोहोचून तुळजापूरपर्यंत इतर साधनांनी प्रवास करावा लागतो.
२०१४ साली धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या आशेचा किरण दाखवणारी ठरली. मात्र, आज दहा वर्षे उलटूनही या मार्गाचा भूसंपादन प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा रेल्वे मार्ग केव्हा पूर्ण होणार ? हे एक कोडेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी थ्रीडी मध्ये व्हिडीओ दाखवून जनतेला स्वप्न दाखवले होते, आता हे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी आहे.
प्रत्येक ;लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वाच्या आश्वासनाची चर्चा होते. पण हे आश्वासन केवळ निवडणूक प्रचाराचा भाग ठरते, असा नागरिक आणि भाविकांकडून वारंवार व्यक्त होत आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात कोणत्याही सरकारला अपयश आले आहे.
सध्या चालू असलेल्या लोकसभा अधिवेशनात, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न केवळ संसदेतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्याही मनात आहे.
आता सरकारला हे लक्षात घ्यावे लागेल की, हा मुद्दा फक्त भाविकांची सोय करण्याचा नाही, तर तुळजापूरच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचाही आहे. तुळजापूर रेल्वेमार्गाच्या स्वप्नाला सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. यात कोणतेही आढळणारे अडथळे दूर करून, या महत्त्वाच्या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्णत्व द्यायला हवे. सरकारला हा प्रकल्प पूर्ण करून विश्वासार्हता दर्शवण्याची हीच योग्य संधी आहे.
– सुनील ढेपे