धाराशिव : रस्त्यावर पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून धाराशिव तालुक्यातील उतमी कायापुर येथे एक युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, इंदीरानगर, उतमी कायापुर येथे राहणारा चांगदेव सदाशिव ताटे (वय 21) याची आरोपी राम सदाशिव ताटे याच्याशी वाद झाला. दि. 26 मार्च 2025 रोजी रात्री 9.30 वाजता हा वाद उफाळून आला. चांगदेव ताटे याने रस्त्यावरून जात असताना कामाचे पैसे मागितल्यामुळे आरोपी राम ताटे याला राग आला. या वादातून राम ताटे याने वस्ताऱ्याने मारहाण करून चांगदेव ताटे याचा निर्घृण खून केला.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली.
या संदर्भात विजाबाई ताटे यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी राम ताटे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव : धाराशिव शहरातील मल्हार चौक, शाहूनगर येथे जातीवाचक शिवीगाळ करून तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम अरुण कोळी (वय 25), राहणार पिंपरी, धाराशिव हे मल्हार चौकात असताना आरोपी आकाश सौदागर कावळे आणि संदेश पोपट जाधव, राहणार शाहूनगर, धाराशिव यांच्यासह इतर तीन व्यक्तींनी तुकाराम कोळी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी आणि लाकडी बांबूने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर जखमी तुकाराम कोळी यांनी दि. 26 मार्च 2025 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 296, 3(5) सह 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
खुदावाडी येथे युवकावर हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यात खुदावाडी येथे एका युवकावर हल्ला करून जखमी करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद मुकींद वाघमारे (वय 28), राहणार खुदावाडी, तुळजापूर हे घरासमोर उभे असताना आरोपी धिरज खंडू भालेराव, परमेश्वर बापु सगट आणि गजानन खंडू भालेराव (सर्व राहणार खुदावाडी, तुळजापूर) यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान आरोपींनी शरद वाघमारे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी लहान कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर जखमी शरद वाघमारे यांनी दि. 26 मार्च 2025 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.