धाराशिव: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत धाराशिवमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीने आपली ताकद वाढवत वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) सोबत घेत आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. एकीकडे विरोधकांची ही मजबूत वज्रमूठ तयार झाली असताना, दुसरीकडे मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
महाआघाडीची घोषणा आणि जागावाटपाची उत्सुकता
शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या जोडीला आता वंचित बहुजन आघाडी आणि रासप आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. एकूण ५५ जागांसाठी हे सर्व पक्ष एकत्र आले असून, ‘कुणाला किती जागा मिळणार?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महाआघाडीची अधिकृत घोषणा करण्यासाठी काही वेळातच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत.
महायुतीत वादाची ठिणगी
एकीकडे महाविकास आघाडी एक दिलाने सामोरी जात असताना, महायुतीमध्ये मात्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे. भाजपने शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. धाराशिव आणि कळंब तालुक्यातील २५ पैकी अवघ्या ३ जागा शिंदे गटाला देऊ केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अनपेक्षित धक्क्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांना शिवसैनिकांकडून फोनवर जाब विचारला जात असल्याचे समजते.
शिंदे गटात ‘मेळ’ नाही
महायुतीतील वादासोबतच खुद्द शिवसेना शिंदे गटाअंतर्गतही विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भूम आणि परंडा तालुक्यात आपली वेगळी चूल मांडली आहे, तर दुसरीकडे उमरग्यात माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटात समन्वयाचा पूर्णपणे अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
आजचा दिवस निर्णायक
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेवटच्या क्षणी महायुतीतील हा तिढा सुटणार की बंडखोरी होणार, आणि महाविकास आघाडीचे नेमके जागावाटप कसे असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.







