पेंद्या – अगं ये गंगे, जरा कपभर चहा लवकर कर बरं …
गंगी – आवं धनी, आता तर दुपारचे चार वाजलेत, अन चहा इतका लवकर ?
पेंद्या – अगं सकाळपासून डोस्क लैच दुखू लागलंय …पार वैताग – वैताग आलात …
गंगी – आता अजून काय झालं म्हणायचं ?
पेंद्या – काय नाय, इलेक्शनचं डोस्क्यात लैच खुळ बसलंय बघ … कुणाचा प्रचार करावा, हेच समजत नाय..
गंगी – तुम्ही तर काँग्रेसचे पक्के निष्ठावंत कार्यकर्ते , तुमची महाविकास आघाडी हाय नव्ह. .. मग ओमदादाचा प्रचार करायचा…
पेंद्या – मी काँग्रेसमधीच हाय, पण मालक बीजेपीत गेल्यापासून सगळेजण कन्फ्युज झालेत…
गंगी – मालक गेले म्हंजी काय झालं, साहेब तर काँग्रेसमध्येच हाईत नव्ह…
पेंद्या – साहेब म्हणत्यात मी ओमदादा बरुबर, मालक म्हणत्यात मी अर्चनाताईबरुबर …मग ऐकावे कुणाचे ?
गंगी – तुम्ही कुणाचा प्रचार करायचा ते तुम्ही करा… म्या तर ओमदादाचा प्रचार करणार बघा…
पेंद्या – ऑ , ते गं कश्यापायी ?
गंगी – म्या पुण्याला एसटीने जात व्हती, बसायला जागा नव्हती, ओमदादाला थेट फोन केला अन कंडक्टरने स्वतः उठून बसायला जागा दिली बघा …
पेंद्या – एसटीत जागा दिली म्हणजे लै मोठं काम केलं व्हय ?
गंगी – तुम्हाला नाय कळायचा एसटीचा प्रवास,… तुम्ही एक मालकांबरुबर कारमध्ये फिरत्याव नव्ह…
पेंद्या – बरं बरं , तू असं कर, तू ओंमदादाचा प्रचार कर अन म्या अर्चनाताईचा प्रचार करतो…
गंगी – लैच बेस्ट… साहेबाच्या घरी एक इकडे अन एक तिकडे चालतं … मग आपल्या घरी का नको… आपण का म्हणून वाईट व्हायचं ?
पेंद्या – बरं , तू हातात मशाल धर अन म्या हातात घड्याळ बांधतो… म्हंजी दोन्ही दादा खुश आणि मालक आणि साहेब बी खुश…
गंगी – ह्या ह्या ह्या… बरं आता चहा करते… तोपर्यंत तुम्ही टीव्ही बघत बसा ..
तेवढ्यात बाहेरून घोषणा ऐकू येतात …
लोकशाही जिंदाबाद … लोकशाही जिंदाबाद…
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )