धाराशिव: केशव श्रीराम केंद्रे या आरोपीला खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी अजिवन कारावास आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी केशव श्रीराम केंद्रे ( रा. फुलवळ ता. कंधार, जि. नांदेड ) आणि मृत संजय गायकवाड ( रा. आळण ता. जि. परभणी ) हे दोघेही हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांची ओळख झाली होती. लॉकडाऊनमध्ये दोघेही पॅरोलवर बाहेर आले होते. त्यानंतर आरोपीने गायकवाडला ड्रायव्हरच्या कामाचे आमिष दाखवून बोलावून घेतले आणि त्याचा लोखंडी व्हील स्पॅनरने मारहाण करून खून केला. त्यानंतर त्याचे प्रेत तेर शिवारात तेरणा धरणाजवळ उसाच्या शेतात टाकून दिले.
याप्रकरणी आकाश गायकवाड यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने १८ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी व मयताच्या मोबाईल फोनचे टावर लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे आढळून आले. साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
या खटल्यात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. व्ही. दसवंत आणि पोलीस कॉन्स्टेबल एस. एन. शेळके यांनी काम पाहिले. अभियोग पक्षाच्या वतीने सौ. एम. एस. जोशी आणि श्री. सचिन एस. सुर्यवंशी यांनी बाजू मांडली.