ढोकी – धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथे विठ्ठल रुक्माई चौकातून मोटारसायकल घेऊन जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत झालेल्या भीषण संघर्षात एका २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार हत्यार खुपसून निर्घृण खून करण्यात आला आहे. तर अन्य ५ जण तलवारी, कोयता, कुऱ्हाड आणि काठ्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या थरारक घटनेप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात २१ नामजद आरोपींसह इतरांवर खुनाचा व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बुकनवाडी (ता. जि. धाराशिव) येथील विठ्ठल रुक्माई चौकात ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून गावातील आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात कुऱ्हाड, कोयता, कत्ती, विळा, तलवारी व काठ्या घेऊन हल्ला चढवला.
आरोपींनी महेश सुरेश चामे (वय २४ वर्षे, रा. बुकनवाडी) याच्या पोटात धारदार हत्यार खुपसून त्याला गंभीर जखमी केले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले आणि नाना आवले यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत तलवारी, कोयते, विळा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
२१ नामजद आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
या घटनेनंतर मयत तरुणाचे वडील सुरेश आप्पाराव चामे (वय ४० वर्षे, रा. बुकनवाडी) यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील २१ आरोपींसह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
-
आरोपी : बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे, पापा शिंदे व इतर (सर्व रा. बुकनवाडी).
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ११८(१), ११८(२), १८९, १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३५२.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ढोकी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.





