धाराशिव – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे सुमारे एक ते दीड महिन्यांच्या दीर्घ प्रशिक्षणासाठी शुक्रवारी रवाना झाले आहेत. यामुळे त्यांनी आपला पदभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे सोपवला आहे. आता डॉ. घोष प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
मागील दोन वर्षांपासून येथे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. सचिन ओम्बासे कार्यरत आहेत. आता त्यांना शासनाने एक ते दीड महिन्यांच्या महसुली प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे बोलावले आहे. यामुळे ते शुक्रवारी कार्यालयात कामकाज करून रवाना झाले.
दरम्यान, जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांच्याकडे सूत्रे सोपवली आहेत. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कधीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवलेला नव्हता. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार दिला जात होता. मात्र, यावेळी झेडपीच्या सीईओंकडे पदभार दिला आहे. आतापर्यंत जे जिल्हाधिकारी दीर्घ प्रशिक्षणाच्या निमित्ताने गेले आहेत, ते पुन्हा परतलेच नाहीत. म्हणजे त्यांची बदली किंवा बढती झाली आहे. यामुळे एखाद्यावेळी डॉ. ओम्बासे यांची बदलीही होऊ शकते. यामुळे जिल्ह्याला पुढील जिल्हाधिकारी कोण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. ओम्बासे हे तीन नवरात्र करणारे कदाचित हे एकमेव जिल्हाधिकारी असतील. यांचा जिल्ह्यातला कालावधी केव्हाच पूर्ण झाला असला तरीसुद्धा फक्त एका मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाने ते जिल्ह्यात टिकून आहेत.बोगस नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र देऊन मिळवलेले जिल्हाधिकारी पद, जिल्हाधिकारी पद मिळाल्यावर शासकीय गाडीचा पत्नीने केलेला दुरुपयोग आणि निवासस्थानात शासकीय लोकांचा खाजगी कामासाठी गैरवापर या बेकायदेशीर गोष्टी केल्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी चर्चेत आहेत. त्यांची केंद्रीय सचिवांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यांना एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी बोलवून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांची तिकडेच बदली केली जाणार आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे अडचणीत
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यावर बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
सुभेदार यांच्या तक्रारीनुसार, डॉ. ओम्बासे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पाच वेळा दिली. पहिल्या चार वेळा त्यांनी ओपन कॅटेगिरीतून परीक्षा दिली, तर पाचव्यांदा ओबीसी प्रवर्गातून परीक्षा देऊन नोकरी मिळवली. त्यांचे वडील प्राध्यापक असून त्यांचे उत्पन्न साडेचार लाखांपेक्षा जास्त होते. असे असतानाही त्यांनी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुभेदार यांची तक्रार गांभीर्याने घेतली असून पुढील चौकशीसाठी ती केंद्रीय सचिव, भारत सरकार यांना पाठवली आहे. यामुळे डॉ. ओंबासे अडचणीत आले आहेत.