धाराशिव जिल्ह्यात शिक्षण विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांच्या कारभाराविरोधात उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांकडे थेट तक्रार दाखल केली आहे.
धाराशिव लाइव्हने केला पर्दाफाश, शिक्षणाधिकाऱ्यांची धमकी?
संघटनेच्या तक्रारीवर ‘धाराशिव लाइव्ह’ने बातमी प्रसिद्ध करताच, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मात्र, या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ‘पन्टर’ मार्फत धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
“तुमच्याकडे काय पुरावे आहेत? मी तुम्हाला सोडणार नाही!“ अशा धमक्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळत आहेत.
तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात आणि सुनावणीही त्यांनीच ठेवली!
इतकेच नव्हे, तर शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी आज, ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता सुनावणीस हजर राहण्याचे पत्र संघटनेला पाठवले होते . मात्र, ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांनीच सुनावणी ठेवावी, हा प्रकारच संशयास्पद आहे, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आणि सुनावणीस येणार नाही, असे कळवले.
“आमची तक्रार ही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांकडे आहे, त्यामुळे सुनावणी शिक्षणाधिकाऱ्यांनी नव्हे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव किंवा जिल्हाधिकारी यांनी घ्यावी,” असे संघटनेचे मत आहे.
संघटनेचा इशारा – पुरावे देऊ, पण सुनावणी योग्य ठिकाणीच!
संघटनेने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे आहेत, जे सुनावणीच्या वेळी सादर करण्यात येतील. मात्र, हे पुरावे शिक्षणाधिकाऱ्यांसमोर नव्हे, तर योग्य अधिकाऱ्यांसमोरच मांडले जातील.
धाराशिव शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चर्चा सर्वदूर!
धाराशिव लाइव्हने शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर, हा विषय जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या या गंभीर आरोपांमुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थीही धक्क्यात आहेत.
या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री लक्ष घालणार का? शिक्षणाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!
ही बातमी नक्की वाचा