धाराशीव: लोहारा तालुक्यातील पेठसांगवी येथे तलाठी अश्विनी बालाजी देवनाळे यांना ३५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावावरील जमीन स्वतःच्या नावावर फेरफार करण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित तलाठ्याने अर्ज पुढे पाठवण्यासाठी ८००० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३५०० रुपये लाच घेण्याचे ठरले.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार, ६ मार्च २०२५ रोजी पथकाने पेठसांगवी येथे सापळा रचला. तलाठ्याने तक्रारदाराकडून ३५०० रुपये स्वीकारताच तिला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाच घेणारी महिला तलाठी
श्रीमती अश्विनी बालाजी देवनाळे वय 35 वर्षे, पद – तलाठी, सज्जा- पेठसांगवी, तालुका-लोहारा, जिल्हा धाराशीव.रा. माडज, तालुका उमरगा, जि. धाराशिव. ( वर्ग-०३)
सापळा कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वस्तू:
- लाच रक्कम: ₹३५००
- इतर रोख रक्कम: ₹२७६०
- सोन्याची अंदाजे ५ ग्रॅम वजनाची अंगठी
- सोनाटा कंपनीचे घड्याळ
- सॅमसंग कंपनीचा मोबाईल
पुढील तपास सुरू
आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, तिला अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच, तिचा मोबाईल तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी याचे पर्यवेक्षण केले, तर मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांनी केले.
भ्रष्टाचाराची तक्रार कुठे कराल?
भ्रष्टाचारासंबंधी तक्रार द्यायची असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग (मो. ९९२३०२३३६१) व पोलीस उपअधीक्षक (मो. ९५९४६५८६८६) यांच्याशी संपर्क साधावा.