बेंबळी : बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री एका इरर्टिगा कारने ट्रकला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम महावीर रायबाण हा इरर्टिगा कार (क्रमांक एमएच १२ टी.वाय. १३८५) चालवत होता. त्याच्या सोबत ओंकार सूर्यवंशी आणि आदित्य महाबोले हे देखील होते. रायबाण हा रुईभर पाटीच्या पुढे पुलाजवळून भरधाव वेगाने कार चालवत होता. त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला (क्रमांक एमएच ०४ बी.जी. ७१३४) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कारची ट्रकला जोरदार धडक बसली.
या अपघातात कारमधील तिघेही जण गंभीर जखमी झाले. ट्रकचालक रमेश यशवंत गोरे (वय ५०, रा. बेंडकाळ, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेबळी पोलीस ठाण्यात राम रायबाण विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबाण याने हायगयी आणि निष्काळजीपणे कार चालवल्याने हा अपघात झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
धाराशिवमध्ये मोटरसायकल अपघात; दोघे जखमी
धाराशिव: शहरातील सुधीर अण्णा पाटील यांच्या घरासमोरील पुलावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी युवराज हौसे (वय २०) हा भुपेश नारायण करवर यासह बार्शी नाक्यावरून सेंट्रल बिल्डिंगकडे मोटरसायकल (क्रमांक एमएच २५ ए.एम. १२६८) ने जात होता. सुधीर अण्णा पाटील यांच्या घरासमोरील पुलावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकल (क्रमांक एमएच २५ बी.सी. ५०५२) चालकाने हायगयी आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याने बालाजी हौसे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात बालाजी हौसे आणि भुपेश करवर हे दोघेही गंभीर जखमी झाले. बालाजी हौसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.