धाराशिव – राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमवरून सुरू असलेला वाद चिघळताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “76 लाख मतं आली कुठून?” या प्रश्नासह काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही मतदान केंद्रांवर मतदार संख्या आणि नोंदवलेली मतं यामध्ये तफावत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात या वादाला आणखी उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी आमदार राहुल मोटे यांनी या मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यांच्या मते, निवडणुकीदरम्यान काही मतदान यंत्रांवर अपेक्षित मतदान झालेले नाही. त्यामुळे 18 मतदान यंत्रांची फेर मोजणी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासाठी त्यांनी 8.5 लाख रुपयांचा शुल्क भरला आहे.
परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्यात अटीतटीची लढत झाली. सावंत यांनी 1509 मतांनी विजय मिळवला. सावंत यांना 1,03,254 तर मोटे यांना 1,01,745 मते मिळाली. या निसटत्या पराभवानंतर मोटे यांनी फेर मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
फेर मतमोजणीचा निर्णय येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. ईव्हीएमवरील आरोप आणि फेर मोजणीच्या प्रक्रियेमुळे परंडा मतदारसंघातील नागरिकांच्या नजरा या प्रकरणावर खिळल्या आहेत. “ईव्हीएम परीक्षा पास होणार की नापास?” हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.