धाराशिव: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिव-उजनी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र आता या नवीन रस्त्याची विटंबना सुरू झाली आहे. शेकापूर ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना, संबंधित कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता रस्त्याची संपूर्ण साईडपट्टी खोदून डांबरी रस्त्यावर खोदलेला मुरूम टाकला आहे.
या रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटर अंतरावरून पाईपलाईन खोदणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे नवीन बांधलेला रस्ता आता धोकादायक बनला आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांचा धोकाही वाढला आहे.
या प्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण घटनास्थळी आले होते. परंतु त्यांनी काय कारवाई केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केले असतानाही, अभियंता चव्हाण यांनी कोणतीही कारवाई का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
उजनी-धाराशिव हा राज्य मार्ग असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. रस्त्याची डागडुजी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देखील होत आहे.
याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण यांच्याशी फ़ोनवरून संपर्क साधला असता, फोन उचलला नाही. यावरून त्यांचे आणि कंत्राटदाराचे साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
Video