धाराशिव – जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनसोंडा शिवारात 24 जुलै 2024 रोजी उत्तम एंटरप्रायझेस कंपनीच्या टॉवरवरून अंदाजे 50,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांची धाडसी चोरी झाली होती. या घटनेनंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाशी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासादरम्यान पथकाला काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले.
गुन्हेगारांनी वापरलेली कार्यपद्धती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तपासाची दिशा निश्चित केली. या तपासादरम्यान पथकाला अशी माहिती मिळाली की, या परिसरात काही संशयित व्यक्तींची हालचाल असते. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून अवघ्या काही दिवसांतच या चोरीत सहभागी असलेल्या पाच आरोपींना गजाआड केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तानाजी उर्फ चिक्या आसाराम काळे (वय २६ वर्षे, रा. अंजनसोंडा), जिवन उर्फ दत्तात्रय अच्युत क्षिरसागर (वय ३१ वर्षे, रा. अंजनसोंडा), आकाश विष्णु खराटे (वय २८ वर्षे, रा. भोगजी), उत्तरेश्वर महादेव दराडे (वय ३० वर्षे, रा. सारोळा मांडवा) यांचा समावेश आहे. आरोपींनी कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तारा वाहून नेण्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पथकाचे कौतुक केले. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आरोपींच्या साथीदारांना पकडण्यासाठी पथक प्रयत्नशील आहे.
तांब्याच्या तारांच्या चोरीचे सत्र वाढले
अलीकडच्या काळात तांब्याच्या तारांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलिसांनी या घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.