धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्यांची रिअॅक्शन होऊन तिच्या त्वचेचे पापुद्रे निघण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यात असा प्रकार गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच घडला असून, गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप उपचार यशस्वी न झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गावात सर्वेक्षणादरम्यान मुलीला तोंडावर पांढरा चट्टा आढळून आला. हा कुष्ठरोगाचा चट्टा असल्याचे निष्पन्न झाल्यावर २२ ऑक्टोबर २०२४ पासून तिला ‘डॅप्सोन’ नावाच्या गोळ्या देण्यात आल्या. मात्र, काही दिवसांतच गोळ्यांची रिअॅक्शन सुरू झाली आणि मुलीच्या अंगावर पुरळ व खाज सुरू झाली.
११ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर मुलीला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन लाख रुपये खर्च करूनही फरक पडला नाही. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी डॉ. मारुती कोरे यांनी सांगितले की, असा प्रकार हजारातून एखाद्या रुग्णाला होऊ शकतो आणि यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग मुलीची योग्य काळजी घेत असून तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, उपचार करूनही फरक जाणवत नसल्याने पालक चिंतेत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि कोठेच परिणामकारक उपचार होत नसल्याने कुटुंब हवालदिल झाले आहे.