कळंब: कळंब बस डेपोतील वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार याच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने एसटी विभागात खळबळ उडाली आहे.
कळंब डेपोतील पीडित महिला वाहक ( वय 30 ) हिच्या जबाबानुसार, गेल्या दोन-तीन वर्षांपासून कुंभार हा तिचा पाठलाग करत होता आणि वाहतूक कक्षात उपस्थित असताना अश्लील टोमणे मारत होता. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे, तर इतर महिला कर्मचाऱ्यांना भडकवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. याआधी झालेल्या वादामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्याला काही दिवसांसाठी निलंबितही करण्यात आले होते. नंतर, “तुला पुन्हा कामावर घेण्याची व्यवस्था करतो, पण त्याआधी एकदा लॉजवर चल,” अशी संतापजनक मागणी कुंभारने केल्याचा आरोप आहे.
दि. ४ मार्च ( मंगळवारी ) रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कळंब बाजार मैदान परिसरात ही धक्कादायक घटना घडली. महिलेने सांगितले की, ती घरी जात असताना मद्यधुंद अवस्थेतील कुंभारने तिचा हात पकडला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावरही त्याने तिच्या अंगावर हात टाकला. तिने आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या साक्षीने आरोपी पळून गेला. यानंतर महिलेने पती व स्थानिकांच्या मदतीने कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम – ७४, ७५, ७८ ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधीही एका महिला कर्मचाऱ्यासोबत रील तयार केल्याच्या प्रकरणात कुंभारला निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे एसटी विभागातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.