धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचा तब्बल ३ लाख २९ हजार मतांनी पराभव करून महायुतीला सणसणीत चपराक दिली आहे. एकीकडे विधानसभेचे पाच आणि विधान परिषदेचे दोन असे सात आमदार, त्यात काँग्रेसमधून आयात केलेले बसवराज पाटील आणि सुनील चव्हाण यांची फळी असताना, ओमराजे निंबाळकर यांची ‘वन मॅन आर्मी’ मोदीच्या त्सुनामी लाटेवर भारी पडली. मुस्लिम, दलित आणि मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान ओमराजेना फायदेशीर ठरले. .
लोकसभेचा धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जातो., पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावर वाद रंगला. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन पैकी तीन आमदार निवडून आले होते. शिवसेना फुटीनंतर तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात तर कैलास पाटील हे ठाकरे गटात राहिले. कैलास पाटील हे एकमेव आमदार ओमराजे यांच्यासोबत होते तर राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे माजी आमदार राहुल मोटे ,आणि दिलीप सोपल यांची खंबीर साथ लाभली. एकीकडे नेत्याची मोठी फळी असताना, ओमराजेचा दणदणीत विजय हा महायुतीच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. तसेच ओमराजेचा विजय हा भाजप आमदार राणा पाटील यांच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे.
महायुतीने तिकीट देताना मोठी चूक केली. राणा पाटील हे भाजपमध्ये असताना, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश देऊन घड्याळ चिन्हावर उभे केले. त्यामुळे ओमराजेंना आयते कोलीत सापडले. धाराशिव जिल्ह्यात पाटील – निंबाळकर वाद सर्वश्रुत आहे. घराणेशाहीचा मोठा आरोप राणा पाटील यांच्यावर असताना, महायुतीने एक तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट द्यायला नको होते आणि दिले तर नवरा एका पक्षात आणि बायको एका पक्षात यामुळे टिंगलटवाळीचा विषय बनला. त्यात अर्चना पाटील यांचे ‘मी कश्याला राष्ट्रवादी वाढवू ‘हे वक्तव्य ओमराजेच्या पथ्यावर पडले. त्यात राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांचे रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण हे वक्तव्य देखील ओमराजेंना फायदेशीर ठरले. अर्चना पाटील यांना भाजपकडून तिकीट मिळाले असते आणि कमळ चिन्ह राहिले असते तर किमान दारुण पराभव झाला नसता.
लोकसभेची निवडणूक ही आमदारांसाठी ‘लिटमस टेस्ट ‘ होती. त्यात फक्त शिवसेना ( उबाठा ) आमदार कैलास पाटील पास झाले तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील ( तुळजापूर ) अभिमन्यू पवार ( औसा ) , राजेंद्र राऊत ( बार्शी ) तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले नापास झाले. आ. कैलास पाटील वगळता अन्य पाच आमदार डेंजर झोनमध्ये आले आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे चार – पाच महिने उरले आहेत. लोकसभेत झालेली चूक विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाही सुधारल्यास महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ३ लाख २९ हजार मतांनी पराभव झाला. या पराभवामुळे आता महायुतीलाच जिल्ह्यात सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेचे कैलास पाटलांच्या धाराशिव मतदार संघात ओमराजेंनी १ लाख ३७ हजार १५८ तर अर्चना पाटलांनी ७६ हजार ७३५ मते घेतली. ओमराजेंना ६० हजार ४२३ ची आघाडी मिळाली. हीच आघाडी पाटील यांना सेफ झोनमध्ये घेऊन जाणारी आहे. तेथे आता महायुतीला प्रबळ व तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.
पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या परंडा मतदार संघात ओमराजेंनी तब्बल १ लाख ३३ हजार ८४८ मते घेऊन ८१ हजार १७७ मतांची आघाडी मिळवली. महायुतीला ५२ हजार ६७१ मते मिळाली. याचे श्रेय राहुल मोटे यांनाही दिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मोटे यांची लिटमस टेस्ट ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत इतकी मते खेचली तर आगामी निवडणुकीत किती मिळणार ? याची चर्चा आहे. यामुळे सावंत यांना आतापासून तळ ठोकावा लागणार आहे.आमदार राणा पाटील यांचा मतदार संघ असलेल्या तुळजापूरात ओमराजेंना ५२ हजार १७६ मतांची आघाडी मिळाली. ओमराजेंना १ लाख ३८ हजार ७९१ मते मिळाली तर अर्चना पाटलांना ८६ हजार ६१५ मते मिळाली. यामुळे आमदार पाटील यांना विधानसभेची निवडणूक जड जाणार आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची कारणे
– मोठा- जनसंपर्क , सोशल मीडियावर आघाडी
– मुस्लिम मतदार 100 पैकी 90 टक्के बाजूला
– मराठा मतदार 100 पैकी 80 टक्के बाजूला
सौ. अर्चनाताई पाटील यांच्या पराभवाची कारणे
– आमदार पती राणा जगजितसिंह पाटील भाजप आणि स्वतः राष्ट्रवादी यामुळे महायुतीला मानणारा वर्ग नाराज
– घराणेशाहीचा आरोप
– मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्याने मराठा मतदारांचा फटका