धाराशिव : संपूर्ण मराठवाडा विभागात दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे संपूर्ण जिल्हाध्यक्ष व आमदार रोहित पवार यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी मराठवाड्यात पावसाळा कमी प्रमाणात झालेला असल्याने जवळपास संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, पाणी तसेच शेतीसाठी पाणी याची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पावसाअभावी दुबार पेरणी करूनही खरीप हंगामाचा खर्च देखील निघू शकलेला नाही तर रब्बी हंगाम घेण्यासारखी परिस्थिती नाही.
मराठवाड्यातील ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तर आठही जिल्ह्यांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, अशी वस्तुस्थिती असताना देखील शासनाने मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील खरीप पिके पाण्याअभावी येऊ शकली नाही.
तसेच नद्या, धरणे, बंधारे यात पाणीसाठा नाही. तरी संपूर्ण मराठवाडा विभाग हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळ सवलती त्वरित देणे गरजेचे आहे. तसेच मागील वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली होती. त्याबाबत शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार रुपये अनुदान ३ हेक्टर पर्यंत जाहीर केले होते. परंतु अद्यापपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही. ते अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान व पिक विम्याची २५ टक्के अॅग्रीम रक्कम त्वरित देण्यात यावे व संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नांदेडचे हरिहर भोसीकर, जालना येथील निसार देशमुख, छत्रपती संभाजीनगर येथील पांडुरंग तायडे पाटील, विश्वजीत चव्हाण, शहराध्यक्ष उद्दीन मुल्ला, माजी आमदार विजय भांबळे, संजय वाघचौरे, प्राचार्य सलीम शेख, प्रशांत जगताप, अतुल गावंडे, भूषण तांबे, सुशील बोर्डे, अण्णासाहेब राठोड आदींची उपस्थिती होती.