छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्याची नसून शिक्षण, रोजगार आणि सुशिक्षित तरुणांच्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे. सलग तीन कार्यकाळ (१८ वर्षे) प्रतिनिधित्व केलेल्या नेतृत्वाच्या कामाचे मूल्यमापन करून यंदा बदलासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना संधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
१८ वर्षांचा हिशोब आणि नव्या नेतृत्वाची गरज
गेल्या १८ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सतीश चव्हाण करत आहेत. त्यामुळे मतदारांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा हिशोब मागणे स्वाभाविक ठरते. पदवीधरांचे किती प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागले? रोजगारासाठी काय ठोस पावले उचलली? स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणींवर काय पाठपुरावा झाला आणि मतदारांशी नियमित संवादाची कोणती व्यवस्था उभी राहिली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनुभवाला मान असला तरी लोकशाहीत पर्यायी नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय समोर आला आहे.
शिक्षणाशी जोडलेला चेहरा
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील दांडगा संपर्क आणि पक्षाची मजबूत संघटनात्मक ताकद या त्यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. पदवीधरांच्या बेरोजगारीच्या व्यथा, स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि कौशल्य विकासाचा अभाव या प्रश्नांची खरी जाण शिक्षणाशी जोडलेल्या नेतृत्वालाच असू शकते, हा मुद्दा अधोरेखित करण्यात येत आहे. निवडणुकीपुरता संपर्क न ठेवता नियमित संवाद ठेवणारा आणि कामाचा हिशोब देणारा प्रतिनिधी म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
पहिल्या पसंतीच्या मताचे आवाहन
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील स्वतंत्रपणे मैदानात असल्याने मतदारांपुढे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र नेतृत्वात बदल हवा असेल, तर तो स्पष्ट भूमिकेतून व्यक्त व्हायला हवा. मागील १८ वर्षांच्या कारभाराचे मूल्यमापन करून पुढील सहा वर्षांच्या विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी मतदारांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




