कळंब – तालुक्यातील मोहा गावात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजना अभिजीत गव्हाणे (वय 20) हीने 5 सप्टेंबर रोजी आपल्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी तिचे पती अभिजीत गव्हाणे, सासू सुशिला गव्हाणे आणि सासरे बालाजी गव्हाणे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजना हिच्या पतीसह सासू-सासरे हे तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकत होते. मटन का बनवले नाही यासारख्या क्षुल्लक कारणांवरून तिला शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार घडत होते. याशिवाय, “तू आमच्या मुलाला फसवून लग्न केले आहेस, तू आम्हाला पसंत नाहीस” अशा शब्दांनी तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता. या सर्व त्रासाला कंटाळून संजनाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणी संजनाच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिच्या पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108, 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.