मुरुम : मिरवणुकीत शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा फोटो घेऊन नाचल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका अल्पवयीन युवकाला मारहाण केल्याची घटना मुरुम येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 मार्च 2025 रोजी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास बाजार मार्ग ते प्रतिभा निकेतन कॉलेज मुरुमकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रेम धनराज फडताळे (वय 17, रा. दाळींब, ता. उमरगा) हा युवक मिरवणुकीत सहभागी होता. यावेळी आरोपी महंमद झाकीर बागवान (रा. मुरुम, ता. उमरगा) आणि शुभम बसवण्णा वासुदेव (रा. बेरडवाडी, ता. उमरगा) यांनी शिवाजी महाराजांनी अफजल खान यास मारलेला फोटो घेऊन नाचण्याच्या कारणावरून फिर्यादीला अडवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कमरेच्या बेल्टने आणि हंटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेबाबत प्रेम फडताळे यांनी 3 मार्च 2025 रोजी तक्रार दाखल केली असून, मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.