धाराशिव जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू असून, जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
धाराशिव विधानसभा मतदारसंघ
धाराशिवमधून शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार कैलास पाटील विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना (शिंदे) गटाचे अजित पिंगळे यांच्यावर 28 व्या फेरीअखेर 31923 मतांची आघाडी मिळवली आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ
भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 20 व्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यापेक्षा 22865 मतांची मोठी आघाडी घेतली आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ
उमरग्यात शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार ज्ञानराज चौगुले पराभवाच्या छायेत असून, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी 21 व्या फेरीअखेर 4472 मतांची आघाडी घेतली आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघ
परंड्यात निवडणुकीची लढत अत्यंत रंगतदार ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) राहुल मोटे आणि आमदार तानाजी सावंत (शिंदे गट) यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. 16 व्या फेरीअखेर मोटे यांनी 601 मतांची आघाडी मिळवली असली, तरी या मतदारसंघात परिस्थिती सतत बदलत आहे.
जिल्ह्यातील निकालांवर लक्ष केंद्रित
धाराशिव जिल्ह्यातील मतमोजणीचे निकाल जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतात. सर्वांचे लक्ष आता अंतिम फेऱ्यांवर आहे.