तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावात पवनचक्की उभारणी प्रकल्पाला विरोध केल्याने शेतकरी सचिन प्रभाकर ठोंबरे यांना ठेकेदाराने गुंडांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी निष्क्रिय भूमिका घेतली असून गुंडांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांच्या यावागण्याच्या निषेधार्थ शेतकरी कुटुंबियांनी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी चौकात उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांनी पोलिसांच्या अन्यायाचा निषेध करत गुंडांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची तुळजापूरातून तातडीने बदली करून चौकशीअंती निलंबित करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
पवनचक्की प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.