(पक्या ऑनलाईन पेपर वाचत बसलेला असतो आणि जोरजोरात हसत असतो.)
भावड्या: आरं पक्या, येड्यावानी काय हसायला लागलायस संध्याकाळच्या पारी? काय सापडलंय काय ऑनलाईन पेपरमध्ये?
पक्या: आरं भावड्या, सापडलंय… सापडलंय! आपल्या जिल्ह्याला लय मोठं ‘रतन’ सापडलंय. आता बघा कशी जिल्ह्याची प्रगती व्हनार ती!
भावड्या: (उत्सुकतेने जवळ येत) व्हय व्हय! म्या पन वाचलं की. आपले ‘राना’ दादा आता जिल्ह्यातून ड्रग्ज हद्दपार करणार हायेत. जागतिक युवा दिसाचं लय भारी काम हाती घेतलंय दादानी. पोरा-बाळांचं भलं व्हईल!
पक्या: (आणखी जोरजोरात हसत) भलं? आरं येडपट्या, भलं न्हाय, आता खरं ‘खळ्ळं’ व्हईल! हे तर असं झालं की, बोकड म्हणतंय, “मी आतापासून मटणाच्या दुकानाला टाळं लावणार!”
पेंद्या: (तोंडातला तंबाखू थुंकत) काय रं पक्या, काय झालंय तरी काय? संध्याकाळच्या पारी कोडी घालू नगंस. भावड्याच्या डोक्याच्या वरनं जाईल पानी!
पक्या: आरं पेंद्या, तूच ऐक! आपले राना दादा ड्रग्जवाल्यांच्या विरोधात मोहीम काढणार हायेत. बरोबर?
भावड्या: हा तर! त्यात हसण्यासारखं काय हाय? चांगलं काम हाय की!
पक्या: आरं थांब की रं जरा! मागच्याच आठवड्यात , तुळजापुरात मोठा सत्कार झाला होता बघा एका मंत्र्याचा…
पेंद्या: व्हय व्हय, आठवतंय की! त्योच की… ज्याच्यासाठी गर्दी जमा करायला पैसं वाटल्याचं बोलत व्हतं लोक!
पक्या: हां! बरोबर! तर त्या सत्काराला, त्या मंत्र्याला हार कुणी घातला व्हता? सत्कार करणारा ‘मुख्य संयोजक’ कोण व्हता?
भावड्या: (आठवण्याचा प्रयत्न करत) कोण व्हता? काय म्या नव्हतो तिकडं…
पेंद्या: आरं, तुळजापूरचा भावी नगराध्यक्ष ‘विनोद गंगणे’ ! दुसरा कोण! मटक्याचा अन… त्या पांढऱ्या पुडीचा राजा!
पक्या: टाळी! आता लागलाय का डोक्याला ताळ! ज्या गंगण्याच्या हातनं हार घालून, त्याच्या खांद्यावर हात टाकून, ” लय मोठे कार्यकर्ते हायेत” म्हणून कौतुक करायचं, आन आता त्याच गंगण्यानं तयार केलेला माल जिल्ह्यातून हद्दपार करायची भाषा करायची! ह्याला काय म्हणावं?
भावड्या: (डोळे विस्फारून) काय सांगतोयस काय पक्या! म्हंजी… त्यो गंगण्या… आन हे राना दादा… बापरे! मला तर काय सुदरायनाच!
पेंद्या: आरं ह्यालाच तर राजकारण म्हणत्यात! एका गालावर पापा घ्यायचा, आन दुसऱ्या गालावर थापड मारायची! आता महाविद्यालयात ‘अँटी नारकोटिक्स क्लब’ काढणार म्हणत्यात!
पक्या: माझी तर एक लय भारी आयडिया हाय!
भावड्या आणि पेंद्या (एकत्र): काय?
पक्या: मी म्हणतो, राना दादानी लई डोक्याला ताण देऊ नये. सरळ त्या विनोद गंगण्यालाच ह्या ड्रग्जविरोधी मोहिमेचा ‘बँड अॅम्बेसिडर’ करून टाकावा!
(हे ऐकून भावड्या आणि पेंद्या क्षणभर गप्प होतात आणि मग तिघेही खळखळून हसायला लागतात.)
पेंद्या: लय इचीभयानक आयडिया हाय रं पक्या! पोस्टर पन कसं भारी दिसंल! एका बाजूला राना दादांचा फोटो, दुसऱ्या बाजूला गंगणे भाऊंचा… आन खाली मोठ्ठ्या अक्षरात लिवायचं – “आम्ही वापरत नाही, फक्त विकतो… पण तुम्ही पण वापरू नका!”
भावड्या: मंग तर पोरं पन कन्फ्यूज व्हतील! घ्यायचं का नाय घ्यायचं? का फक्त विकायचं?
पक्या: ह्यालाच म्हणत्यात ‘संवेदनशील पद्धतीने’ जाणीव जागृती! कळलं का भावड्या? गंगणे भाऊ पथनाट्यातून सांगणार, “आरं पोरांनो, हे चांगलं नसतंय!”… आन पडद्यामागं म्हणणार, “माल ताजा हाय, घेऊन जा!”
(तिघेही एकमेकांकडे बघून पुन्हा हसता हसता जमिनीवर लोळतात.)
पेंद्या: च्यायला! हे राजकारण लय गमतीशीर असतंय रं!
- बोरूबहाद्दर