तामलवाडी – तामलवाडी येथील पुलावर 4 जुलै 2024 रोजी झालेल्या एका भीषण अपघातात मोटारसायकलस्वार दिपक किसन उर्फ किशन नवले (वय 34, रा. गांधी चौक शाहाबाद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर ते तुळजापूर रोडवरून (एनएच 52) आपल्या मोटारसायकलने (क्र. एमएच 13 बी.यु. 5495) प्रवास करत असताना दुपारी 1:45 वाजता कार (क्र. एमएच 20 बी.एन 2883) ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक वसिम यासीन शेख (रा. सोलापूर) यांनी हायवेवरून भरधाव वेगाने गाडी चालवत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या धडकेत मोटारसायकलस्वार दिपक नवले हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत दिपक नवले यांचे नातेवाईक गणेश गिरीधर गर्जे (वय 45, रा. मंत्री चांडक नगर भवानी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात 3 ऑगस्ट 2024 रोजी कारचालक वसिम यासीन शेख यांच्याविरुद्ध भादंवि कलम 281, 125(ब), 106 (1) (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.