मुरुम – उमरगा तालुक्यातील आलुर येथे ४० वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपींनी केलेल्या भांडणाच्या त्रासाला कंटाळून अमीर राजेशा मकानदार यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मुरुम पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमीर मकानदार यांनी करीमशा मकानदार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंरीमशा मंजलेशा मकानदार, लैलाबी करीमशा मकानदार, हुसेन करीमशा मकानदार आणि काशीम करीमशा मकानदार यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे वडील बशीरा मकानदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
१७ ऑक्टोबर रोजी बशीरा मकानदार यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०८, ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.