नळदुर्ग – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नळदुर्ग येथे एका मोठ्या कारवाईत काळ्या बाजारात जाणारा जवळपास ९३० पोते रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. हा तांदूळ दोन ट्रकमधून रायचूरहुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती की काही जण रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये स्मगल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान,नळदुर्ग – तुळजापूर रोडवर गंधोरा शिवारात संशयास्पद असे दोन ट्रक आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ असल्याचे आढळून आले.
के ए ३२, डी ३५६७ आणि के ए २८, डी ८६९९ असे या ट्रकचे क्रमांक असून, ते दोन्ही ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहेत. ट्रकमधील तांदूळ हा रेशन दुकानांमधून गोरगरिबांना कमी दरात वाटप करण्यात येणारा होता. मात्र तो काळ्या बाजारात विकून नफा कमावण्याचा प्रयत्न केला जात होता.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रक चालक आणि तांदूळ वाहतूक करणाऱ्याना अटक करण्यात येणार आहे. गोरगरिबांचा तोंडाचा घास काढून व्यापाऱ्यांना विकण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. जे विकले आणि ज्यांनी घेतले त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.