तुळजापूर : नंदगाव शिवारातील शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या बनीमला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली. या आगीत सुमारे २४ एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या तीन बनीम जळून खाक झाल्या असून, शेतकऱ्याचे तब्बल ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सोमन्ना येणगुरे (वय ५८, रा. नंदगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांची नंदगाव शिवारात गट क्रमांक ५६१ व ५२४ मध्ये शेती आहे. या शेतातील सुमारे २४ एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या तीन बनीम साठवून ठेवण्यात आल्या होत्या.
२८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या बनीमला आग लावून दिली. आगीमध्ये सोयाबीन जळून मोठे नुकसान झाले. या घटनेत आपले सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी दत्तात्रय येणगुरे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६(एफ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.




