परंडा : कौडगाव येथे ४२ कामगारांना पत्र्याच्या शेडमध्ये व घरात डांबून ठेवून दररोज तब्बल १६ ते १७ तास काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामगारांना मारहाण, शिवीगाळ व धमकी देऊन काम करून घेतले, तसेच कामाचा कोणताही मोबदला दिला नसल्याची तक्रार परंडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी सोमनाथ देवकर आणि समाधान अशोक पाडुळे (दोघे रा. कौडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कौडगाव येथे कामाच्या निमित्ताने बाहेरून कामगार आणले होते.
यामध्ये फिर्यादी चंदु इगाप्पा यतनाळकर (वय ३३, रा. विजापूर, गांधीनगर, ता. जि. विजापूर, ह.मु. कौडगाव, ता. परंडा) यांच्यासह एकूण ४२ कामगारांना पत्र्याच्या शेडमध्ये व घरामध्ये ठेवण्यात आले. दरवाजांना कुलूप लावून त्यांना डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कामगारांकडून दररोज १६ ते १७ तास काम करून घेण्यात आले. यावेळी त्यांना वेळोवेळी मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करून धमकावण्यात आले. एवढेच नव्हे तर काम करून घेतल्यानंतरही फिर्यादीसह इतर कामगारांना कोणत्याही प्रकारचा कामाचा मोबदला देण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चंदु यतनाळकर यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), १२७(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच बंधबिगार पद्धतीचे उच्चाटन अधिनियम, १९७६ मधील कलम १६, १७ व १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे कौडगाव परिसरात खळबळ उडाली असून, ४२ कामगारांना अशा प्रकारे डांबून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतल्याच्या आरोपाची पोलिसांकडून पुढील तपासणी सुरू आहे.




