धाराशिव | खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी शिवसेना (ठाकरे गट) सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात धाराशिव शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा निधी मंजूर करून घेतला आहे.
मंगळवारी विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निंबाळकर यांनी धाराशिव शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली. त्यानंतर धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
मंजूर विकासकामे
🔹 आठवडे बाजार विकास – ₹८ कोटी
🔹 राजमाता जिजाऊ उद्यान विकास – ₹५ कोटी
🔹 छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकास – ₹३ कोटी
🔹 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकास – ₹२ कोटी
मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये आठवडी बाजार विकसित करण्यासाठी ८ कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी ५ कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी ३ कोटी रुपये आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या विकासकामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
निधी मंजुरीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच धाराशिवच्या विकासाचा प्रवास यापुढेही वेगाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या घडामोडीत शिवसेनेत प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपल्या नव्या राजकीय वाटचालीची जोरदार सुरुवात केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, ही विकासकामे धाराशिव नगरपरिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) राबविण्यात येणार असून मंजूर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करणारा हा निर्णय असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!






