बेंबळी – दौलत असून उपयोग नाही, दानत असली पाहिजे … या म्हणीला सत्यात आणत धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील वाघे आजीने स्वतःची जमीन विकून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी 18 लाखाचे सोन्याचे दागिने दान केले आहेत, वाघे आजीने आतापर्यंत विविध देवस्थानाला 50 लाखाचे दान केले आहे.
धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावच्या लिंबाबाई वाघे या 80 वर्षाच्या आजीला मुल बाळं नसुन पतीचेही ५० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वाघे बाई यांनी आता पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 50 लाख रुपयापैक्षा जास्त सोने.चांदी अशा वेगवेगळ्या स्वरुपात दान केले आहे.
११ पैकी सहा एकर जमीन विकून एवढ दान करणाऱ्या वाघे यांच्या घरी लाईट नाही आणि स्वयपाकसाठी गॅस देखील नाही, चुलीवर स्वयंपाक केला जातो.आपल्या घरातील वीजेची जोडणीही लिंबाबाई वाघे यांनी तोडून टाकली आहे. रात्रीचा वेळ केवळ मिणमिणत्या दिव्याच्या सानिध्यात जातो. घरात पाण्यासाठी घागर, धान्य ठेवण्यासाठी जुन्या पद्धतीची खापराची भांडी, दोन तीन साड्या असेच साहित्य सोबत असते. वार्धक्य आलेले असतानाही स्वयंपाक आणि अन्य कामे स्वतःच करतात.
स्वतःची शेतजमीन विकून विठ्ठल रुक्मिणी चरणी 18 लाखाचे दागिने श्री विठ्ठल मंदिराला दान करणाऱ्या वाघे आजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाजात एकीकडे दुसऱ्याचे लुबाडणाऱ्यांची संख्या वाढत असताना, लिंबाबाई वाघे यांच्या श्रद्धेची, दानपणाची आणि समर्पणाची धाराशिव जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
मला लेंकरुबाळ नाही, नवराही सोडून गेलाय… माझी इठ्ठलावर लै श्रद्धा हाय… तोच मला जगण्याची ताकद देतो…माझ्या माघारी शेती ठेवून काय करायचं हाय म्हणून इठ्ठलाला सोन्याचा कडदोरा आणि रुक्मणीला गंठण केलं आणि लै दिसांची इच्छा पूर्ण झाली …
– लिंबाबाई वाघे, बेंबळी
व्हिडीओ पाहा